सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी तरूणाई कोणत्याही थराला जात आहे. जीव धोक्यात घालून स्टंटबाजी देखील करतात. अशीच एक घटना अहिल्यानगरमधून समोर आलंय. रील बनविण्याच्या नादात तरूणाला गळफास बसल्याची घटना घडली आहे. हा तरूण व्हिडिओ बनविण्यासाठी गळफास घेत होता, पण यात त्याला खरंच फाशी बसली. तातडीने उपचार मिळाल्याने या तरूणाचा जीव वाचल्याचं कळतंय.
खुळं जीवावर बेतलं
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करील, ते सांगता येत नाही. हे खुळं अनेकदा जीवावर बेतलं आहे. जामखेडमधील या तरूणाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं कळतंय. या घटनेनं संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची मागिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने या तरूणाला रूग्णालयात दाखल केलं होतं.
जामखेड करमाळा रोडजवळ असलेल्या एका हजार फूट खोल एक नाला आहे. या ठिकाणी हा तरूण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होता. प्रकाश बुडा असं या तरूणाचं नाव असून तो एक हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. तो मूळचा नेपाळचा असल्याची माहिती मिळत आहे. फाशी घेण्याचा बनाव करत त्याने व्हिडिओ शुट करायला सुरूवात केली होती. मात्र, दोरी त्याच्या गळ्याला अडकली अन् तो बेशुद्ध होवून फासावर लटकला.
सोशल मीडियाच्या हव्यासापोटी जीव धोक्यात घालू नये, असं आवाहनच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केलं आहे. संजय कोठारी यांनी म्हटलं की, गळफास घेतलेली व्यक्ती सहसा वाचत नाही. परंतु सकाळी आठ वाजेच्या सुमारास फोन आला की, थोडासा जीव वाटल्यासारखं वाटत आहे. त्यानंतर लगेच संजय कोठारी हे रूग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्याचा जीव आता वाचला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Leave a Reply