जयंत पाटलांच्या मनात दुसरं काहीतरी….; देवेंद्र फडणवीसांना नेमकं म्हणायचं काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आज २६ वा वर्धापनदिन आहे. या निमित्त पुण्यात पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या निमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला हवी’ अशी विनंती पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे केली. जयंत पाटील यांच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की,” हे जाणून घेण्यासाठी मला जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावं लागेल. सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त करा असे ते म्हणाले, कदाचित शरद पवार त्यांना जबाबदारीतून मुक्त करणार हे माहित असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरं काहीतरी आहे, म्हणून असं म्हणाले, हे मला माहिती करून घ्यावं लागेल,” अशी खोचक प्रतिक्रीयाही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार म्हणाले की, फूट पडली. पण त्याकडे लक्ष देऊ नका, जोमाने कामाला लागा. पण त्यांनी दोन्ही पवार एकत्र येतील या चर्चेला पूर्णविराम दिला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “ते एकत्र येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही” अशा शब्दांत उत्तर देत फडणवीसांनी टोला लगावला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एका इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आकडेवारीसह लेखाद्वारे उत्तर दिलं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाला पुराव्यासह उत्तर दिलं आहे. खरंतर राहुल गांधींसोबत डिबेट करण्यासाठी माझी गरज नाही. आमचा कार्यकर्ताही पुरेसा आहे. पण त्यांना डिबेट करायचीच असेल तर मी तयार आहे.”

दरम्यान, राज्यात येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, याबाबत आताच काही सांगू शकत नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *