महाराष्ट्रात दारू महागली; देशी मद्य 80 रुपये तर इतर ब्रँडच्या दारुची किंमतही 360 रुपयावर पोहचली

तळीरामांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महाराष्ट्रात दारू महागली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने मद्याचे दर वाढवले आहेत. 180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे. देशी मद्य 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य 205 रुपये तर, विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्डची किंमत 360 रुपये इतकी झाली आहे. मद्य शुल्कवाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदे नव्याने भरले जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे ,पुणे ,नाशिक ,नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहेत. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *