शाळेतील विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार, 7 विद्यार्थ्यांसह 9 जण ठार, शेवटी स्वतःवरही गोळी झाडली

ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना समोर आली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सी एपीएच्या वृत्तानुसार, शाळेतील एका विद्यार्थ्यानेच हा गोळीबार केला आणि शेवटी त्याने स्वतःवरही गोळी झाडली. ग्राझ शहरामध्ये झालेल्या या गोळीबारात 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार
ग्राझमधील एका शाळेतील विद्यार्थी हा बंदूक घेऊन शाळेत पोहोचला. त्यानंतर त्याने समोर दिसेल त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर या विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी 10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) शाळेच्या इमारतीतून गोळ्यांचा आवाज ऐकू आला.

पोलिसांनी शाळा रिकामी केली
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी लोकांना परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाचे ग्राझ शहर देशाच्या आग्नेय भागात आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे 3,00,000 इतकी आहे.

मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात मृतांमध्ये 7 विद्यार्थी, एक शाळेचा कर्मचारी आणि स्वतः गुन्हेगाराचा समावेश आहे. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहरासाठी रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की काही लोक जखमी देखील झाले आहेत, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *